बीड

बीड जिल्हयातील ‘या’ तालुक्यात जनता कर्फ्यू!


बीड :- जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे सत्र सुरूच असून बुधवारी केज शहरातील अजीजपुरा भागात राहणाऱ्या एका 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे मंगळवारी तब्बल 17 रुग्ण आढळून आल्याने व्यापाऱ्यांनी सहा दिवस व्यापरपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी शहरातील अजीजपुरा भागातील ५५ वर्षीय इसमाचा अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील इसम आडस येथे ग्रा.पं.कर्मचारी म्हणून कार्यरत होते. रात्री पाठवलेल्या स्वॅबमध्ये १७ रूग्ण हे केज येथील आढळून आल्याने केजच्या व्यापाऱ्यांनी सहा दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज व्यापारी महासंघाने तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीत शनिवार ते गुरूवार या दरम्यान शहर बंद राहणार असल्याचे ठरवण्यात आले.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढु लागले. रात्री जिल्हाभरात ७५ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यात १७ रूग्ण हे केज शहरातील असल्याने शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील अजीजपुरा भागात राहणाऱ्या ५५ वर्षीय इसमास कोरोनाच्या लागण झाल्याने त्याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.

दरम्यान व्यापाऱ्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तहसीलदार दुलाजी मेंडगे, पीआय त्रिभुवन, मुख्याधिकारी विशाल भोसले यांची उपस्थिती होती. शनिवार ते गुरूवार हे सहा दिवस शहर कडकडीत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडगे यांनी केले आहे.