राम मंदिर : सत्य, अहिंसा आणि बलिदानाला न्यायप्रिय भारताची देण – पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झालीय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. भूमिपूजन करणाऱ्या पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १९८९ पासून जगभरातून भक्तांनी राम मंदिरासाठी विटा पाठवल्या आहेत. तब्बल २ लाख ७५ हजार विटांतील १०० विटांवर ‘जय श्रीराम’ असं कोरलेलं आहे. यातील नऊ विटा पूजेत सामील करण्यात आल्या आहेत. मोदींसोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल हेदेखील पूजेसाठी उपस्थित होते. दरम्यान, राम मंदिराचे भूमिपूजन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला संबोधित केलं.
– ‘सियापती रामचंद्र की जय’ अशा जयजयकारासहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची समाप्ती केली.
– आता आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. उशीर करायचा नाही. हाच श्रीरामांचा आजचा संदेश आहे : मोदी
– जगातले अनेक लोक स्वत:ला रामाशी निगडीत मानतात. कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इराणमध्येही राम कथा आढळतील. नेपाळ आणि श्रीलंकेचा तर रामांचा आत्मीय संबंध आहे – मोदी
– तुलसीदास यांचे राम सगुण राम आहे. नानक आणि कबीर यांचे राम निर्गुण राम आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींचे रघुपती राम आहेत. राम वेगवेगळ्या रुपांत आढळतील. भारतात ते अनेकतेत एकतेचं सूत्रं आहेत. तामिळ, मल्याळम, बांग्ला, काश्मीर, पंजाबीमध्ये राम आहेत – मोदी
– श्रीराम भारताच्या आत्म्यात वसलेत : पंतप्रधान मोदी
– इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. श्रीरामांना खारीसहीत वानर, केवटच्या वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीनं दलित, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गानं स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती…. त्याच पदधतीनं सर्वांच्या सहकार्यानं राम मंदिराचं निर्माण होतंय – मोदी
– सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशवासियांनी शांतीसहीत सर्वांच्या भावाना लक्षात घेत व्यवहार केला. आजही तीच मर्यादा पाहायला मिळतेय – मोदी
– राम मंदिर निर्माणाची प्रक्रिया वर्तमानाला भूतकाळाशी, स्व ला संस्काराशी, नर ला नारायणाशी जोडण्याचं प्रतिक आहे – मोदी