Popular News

धक्कादायक;अ‍ॅम्बुलन्स न आल्याने 5 कोरोना रुग्ण 12 तासांपासून घरातच

4 Aug :- कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा प्रशासन आणि नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहेत.कोरोनाबाधितांचा उंचावत जाणारा आलेख आवाक्याच्या बाहेर जात असल्याने आरोग्य विभागाला पुरेशा सुविधा देण्यात अपयश येत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.सरकारी अ‍ॅम्बुलन्स नादुरुस्त झाली असल्याचे कारण देत कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 रुग्णांना घरातच आयसोलेट व्हा असे सांगण्याची वेळ आलीय. गुहागरमध्ये आज सकाळी 5 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरातून कुठेही जाऊ नका, तुम्हाला न्यायला सरकारी अ‍ॅम्बुलन्स येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र रात्र झाली तरीही गाडी आली नाही आणि त्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या नातेवाइकांनी धावपळ सुरू केली.

मात्र गाडी आज दुरुस्त होणार नाही, उद्या सकाळी होईल असे सांगत तुम्हाला घरातल्या घरी आयसोलेट व्हावे लागेल असे सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 2 रुग्ण हे गुजगरमधील कुंभारवाडीतले आहेत तर उर्वरित 3 जण हे गुहागर मोहल्ला येथे राहतात.कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतर कोणालाही संसर्ग होऊ नयेत त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू व्हावेत यासाठी खरंतर कोविड सेंटर तयार करण्यात आलेत मात्र 12 तास उलटून देखील प्रशासनाने काहीच हालचाल न केल्यामुळे गुहागरमधील 5 जणांना मंगळवारची रात्र घरात काढण्याची वेळ आली आहे.