जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव!
4 Aug :- कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे.राज्यात झोपडपट्टी पासून अनेक सुरक्षित स्थळी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.अनेक सेलिब्रेटी,राजकीय नेते,अभिनेते,खेळाडू,प्रशाकीय अधिकारी कोरोना विषाणूच्या चपेटीत अडकले आहेत.आताच हाती आलेल्या माहितीनुसार सांगलीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील एका विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा हादरून गेली असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या साडेचार महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोनाला दूर थांबवले होते. या कार्यालयात एकालाही लागण झालेली नव्हती. मात्र गेल्या महिनाभर जिल्ह्यात रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढली आहे.
जून महिनाअखेरीस 385 असलेली रुग्णसंख्या साडेतीन हजाराच्या घरात गेली आहे.त्यामुळे कुणाला कोरोना आहे आणि कुणाला नाही हे तपासणेच आता कठीण आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ महिलेला अधिकाऱ्याला कोरोनाने ग्रासल्याने झाल्याने धक्का बसला आहे.