बीड

चर्चा तर होणारच! महिलेने दिला पतीला तिहेरी तलाक, सासऱ्याने केली मारहाण

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका महिलेने आपल्या पतीला तिहेरी तलाक दिला आहे. या प्रकरणी पतीने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल करून कायदेशीर मदतीची मागणी केली आहे. सतत होणाऱ्या भांडणाला वैतागून अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मुमताज शेख नावाच्या महिलेने पतीला तलाक दिला. त्यानंतर ती आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.

महिलेचा पती शेरखान पठाण याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने तिहेरी तलाक दिल्यानंतर बकरी ईदच्या दिवशी तो मुमताजच्या माहेरी तिला आणि मुलांना भेटण्यासाठी गेला होता. त्याचवेळी मुमताजच्या वडिलांनी मारहाण केली, असा आरोप त्याने तक्रारीत केला आहे. मुमताजच्या वडिलांनी केलेली मारहाण आणि तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पठाण याने पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. तर, पठाण हा नेहमी मारहाण करत असे. त्यामुळे त्याच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे मुमताजचे म्हणणे आहे.

वेजलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एल. डी. ओहदेदार यांच्या म्हणण्यानुसार, या तलाकला वैध मानू शकत नाही. मुफ्ती असजाद कास्मी यांनी सांगितले की, इस्लामनुसार, कोणतीही महिला ही आपल्या पतीला तिहेरी तलाक देऊ शकत नाही. दरम्यान, हे तलाक प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्याची अहमदाबादसह आजूबाजूच्या शहरांमध्येही जोरदार चर्चा आहे.