बीड

मुंबई पोलिसांवर बोट ठेवणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी चांगलेच झापले

मुंबई, 04 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरुद्ध बिहार असा सामना रंगला आहे. तपासावरून दोन्ही राज्यामध्ये वाद पेटलेला असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवरच बोट ठेवून वादात उडी घेतली. त्यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.

अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीका करणारे ट्वीट केले होते. ‘सुशांत प्रकरणामुळे मुंबई शहर आता सुरक्षित राहिले नाही. इथं निष्पाप लोकांच्या बाबतीत माणुसकी दाखवली जात नाही.  मुंबईत आता स्वाभिमानी आणि साध्या लोकांचं जगणं सुरक्षित नाही आहे’ असं ट्वीट करून अमृता फडणवीस यांनी नव्या वादाला तोंड फोडले.

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटचा समाचार घेत चांगलेच फटकारून काढले आहे.

‘तुम्ही हे असं कसंच म्हणू शकता, जिथे मुंबई शहरात लाखो लोकांचे संसार चालतात. हे शहर लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास ताकद देते. पण एवढंच नाहीतर विना झेड सुरक्षा सुद्धा लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवते’ असं म्हणत सणसणीत टोला लगावला.

‘कोरोनाच्या परिस्थितीतही मुंबई पोलीस हे आपल्या सर्वांची 24 तास सुरक्षा पुरवत आहे’ असंही शहाणे यांनी अमृता यांना आठवण करून दिली.

तसंच, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा राजकीय मुद्दा करून ट्वीट करू नये, जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशी घटना घडली असती तर तेव्हाही असेच ट्वीट केले असता का?’ अशा शब्दांत रेणुका शहाणेंनी खरमरीत टीका केली.

‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची निपक्षपणे चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणावर मीडिया आणि राजकारण्यांचा कोणताही दबाव असता कामा नये’, असं परखड मतही रेणुका शहाणेंनी व्यक्त केले.

तर दुसरीकडे  युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती.

वरुण सरदेसाई म्हणाले की, ‘तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय  मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन असतात आणि त्यांच्यावर असा नीच आरोप करता?’ अशा शब्दात ट्वीट केलं आहे.

तसंच, ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !!’ अशा कठोर शब्दात सरदेसाई यांनी टीका केली आहे.