बीड

‘वंचित’कडून निवडणूक लढवलेल्या नेत्याचे महिलेवर लैंगिक अत्याचार

 कोल्हापूर: महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी वंचित बहुजन विकास आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले हाजी असलम सय्यद याच्यावर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सय्यद याला अटक करण्यात आली असून, पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, असलम शेख याची विलगीकरण कक्षात एका महिलेसोबत ओळख झाली होती. तेथे त्या महिलेशी त्याने ओळख वाढवली. त्यानंतर त्याने लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्या महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले असून, तिला एक मुलगा आहे. त्यानंतर मात्र, सय्यद याने जबाबदारी झटकली. तो तिला टाळायला लागला. अखेर तिने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सय्यदविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, तो सध्या कोठडीत आहे.

सय्यद याने गेल्या वर्षी हातकणंगले मतदारसंघातून वंचित बहुजन विकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याला लाखांवर मते मिळाली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस ठाण्यात प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा होती; मात्र फिर्यादी महिलेने याबाबत प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून माहिती दिल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.