‘उद्धव ठाकरे यांना कायद्याची समज नाही’
मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. ज्यांना सुशांतच्या केससंदर्भात सर्व पुरावे असतील त्यांनी कृपया समोर यावं असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर सुशांतच्या कुटुंबियांचे वकील यांनी ठाकरे यांना कायद्याची फारशी माहिती नसल्याचं सांगितलं.
सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह म्हणाले की, ही एक क्रिमिनल केस आहे आणि यात प्रॉसिक्यूशनची जबाबदारी तक्रार करणं नसून सत्य बाहेर आणणं असतं. त्यांची प्रतिक्रिया फार विचित्र आहे. यावरूनच त्यांना कायद्याचं फारसं ज्ञान नसेल असं दिसतं. कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये प्रॉसिक्यूशनची जबाबदारी सत्य बाहेर आणणं असतं. मुंबई पोलीस सत्याचा योग्यपद्धतीने तपास करू शकली नाही. उलट ते सुशांतच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी करत नाहीयेत. ते पुढे म्हणाले की, आता हे काम बिहार पोलीस पूर्ण करेल.
रियाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर उभे राहिले प्रश्न
विकास सिंह म्हणाले की, ‘रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयात ही केस बिहारहून मुंबईत ट्रान्सफर करण्याची याचिका दाखल केली होती. याआधी ती म्हणाली होती की, मुंबई पोलिसांची चौकशी योग्य पद्धतीने नसल्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. आता ही केस पटणामध्ये नोंदवल्या गेल्यानंतर तिने मुंबई पोलिसांनीच या केसचा तपास करावा असं तिचं म्हणणं आहे. तिला नक्की हवं काय आहे.. ती कशाने असंतुष्ट आहे?’