News

चीनशी मुकाबला करावाच लागेल’; परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील सीमेवरील हिंसक घटनेनंतर निर्माण झालेल्या भारत-चीन ताणावाच्या (India-China Standoff) पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. चीनचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला तयार रहावे लागेल, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे हे वक्तव्य चीनसोबतच्या ५ व्या फेरीतील चर्चेपूर्वी आले आहे. भारत-चीनही नियोजित चर्चा यापूर्वी रद्द करण्यात आली होती. मात्र, आज ही बैठक होत आहे.

चीन या देशासोबत समतोल गाठणे हे सोपे काम नसल्याचे जयशंकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले आहे. भारताला चीनचा आता विरोध करावा लागणार असून आता मुकाबल्यासाठी उभे राहावेच लागेल, असे जयशंकर म्हणाले.

ज्या प्रकारे चीन सीमेवर कारवाया करत आहे, त्या पाहता त्याचा व्यापारावर देखील मोठा परिणाम होईल हे निश्चित, असेही जयशंकर यांनी चीनला संदेश देताना म्हटले आहे. लडाखपूर्व मधील भारत-चीनदरम्यानची स्थिती आणि दोन्ही देशांचे संबंध हे दोन विषय वेगळे ठेवून विचार करताच येणार नाही आणि हे सत्य आहे, असेही जयशंकर म्हणाले.

चीन जराही नमते घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट होत असून, या परिस्थितीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे वक्तव्य केले आहे. लडाख सीमेजवळून आपले सैन्य आपण मागे घेऊ असे चीन सांगत असला तर मात्र तो तशी कृती करताना दिसत नाही. हे पाहता भारत आणि चीन दरम्यानची ५ व्या फेरीतील बैठक रद्द झाली होती. तथापि, आज ही बैठक होत आहे.

अमेरिकेसोबतची भारताचे संबंध बदलत आहेत- जयशंकर

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे अमेरिकेशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केले. भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध आता बदलत असल्याचे ते म्हणाले. अमेरिका हा भारताचा पारंपरिक मित्र नसला तरी आता या दोन देशांमधील संबंध बदलताना दिसत असल्याचे ते म्हणाले. चीनसोबत भारताचे संबंध द्विपक्षीय आहेत, जर अमेरिकेसोबतच्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर हे पाहिले असता हा अंदाज चुकीचा ठरू शकतो, असेही जयशंकर म्हणाले.