एका क्षणात नामांकित डॉक्टरचं बँक अकाऊंट झालं रिकामं, बारामती शहरातील धक्कादायक प्रकार
बारामती, 1 ऑगस्ट : बारामती शहरातील एका नामांकित डॉक्टरला ऑनलाइन लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. इंटरनेटद्वारे बँक अकाऊंटमधील सर्व रक्कम काढून घेऊन डॉक्टर दाम्पत्यांची तीन लाख 32 हजार 72 रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद डॉक्टर महेंद्र दोशी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
शहरातील डॉ. महेंद्र दोशी हे आपल्या रमन हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना मोबाईलवर फोन आला आणि तिथूनच सुरू झाला फसवणुकीचा प्रकार.
मी पेटीएम कंपनीतून राकेश मल्होत्रा बोलत असून तुमचे पेटीएम केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगून डॉक्टर महेंद्र दोशी यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ऑनलाइन क्विक सपोर्ट ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आलं.
त्यानंतर दोशी यांच्या ॲक्सिस बँकेत असणाऱ्या आकाऊंटचा मिळालेला ओटीपी नंबर घेऊन ॲक्सिस बँक अकाउंटमधील सर्व रक्कम काढून घेतली. तसेच त्यांचे आयसीआयसीआय बँक अकाउंटमधून देखील सर्व रक्कम काढून घेतली. एवढ्यावरच न थांबता त्या भामट्याने सदर डॉक्टरांची पत्नी संगीता यांच्या अकाऊंटमधील रक्कम देखील काढून घेतली. यासंदर्भात बारामती शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर अधिक तपास करीत आहेत.
दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्येही एका डॉक्टरची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांसाठी असलेल्या योजनेतून आठ कोटींचे कर्ज काढून देतो,असे सांगून पिंपरी चिंचवड परिसरातील एका भामट्याने डॉक्टरची 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
डॉ. अमित वाघ असं फसवणूक झालेल्या डॉक्टरचं नाव असून वाघ यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन पवार असं नाव सांगणाऱ्या व्यक्तीने तब्बल 40 लाख रुपये रोख लंपास करून फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.