News

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक, मुंबईत आईचं निधन

मुंबई, 1 ऑगस्ट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शारदाताई टोपे यांच्यावर उद्या दिनांक 02 ऑगस्ट 2020 रविवार रोजी सायंकाळी 04:00 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शारदाताई टोपे हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. मात्र उपचारदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर ॲडमीट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ॲडमीट करण्यात आले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.

‘ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडrल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील,’ अशी भावना मंत्री टोपे यांनी व्यक्त केली.