News

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’, सदाभाऊ खोत घसरले; राजकीय वातावरण तापलं

सांगली, 1 ऑगस्ट : ‘राजू शेट्टी म्हणजे काजू शेट्टी असून या भंपक माणसाची शेतकऱ्यांनी देवाला सोडलेल्या वळूसारखी अवस्था झाली आहे,’ अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे. सांगलीच्या आटपाडीतील झरे या ठिकाणी बोलत होते.

महायुतीच्या वतीने आज राज्यभर दूध दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनावरून माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन म्हणजे कोंबडी चोरीचं आंदोलन असलेल्या व्यक्तींनी केलेलं आंदोलन आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली होती.

या टीकेवरून सदाभाऊ खोत यांनी पलटवार करत राजू शेट्टी यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘राजू शेट्टी आता हे काजू शेट्टी झाली आहेत आणि या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही, तसंच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. शेतकऱ्यांनी शेट्टी यांना रेड्या प्रमाणे सोडले आहे. त्यामुळे आता काय करावं आणि काय नाही, हे सूचत नाही. याउलट राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचं नाटक केले आहे. बारामतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पायी गेलो आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी मात्र आपल्या आमदारकीसाठी पाय चाटायला गेले. मात्र अजूनही राष्ट्रवादीने त्यांना आमदारकी दिलेली नाही. कारण राजू शेट्टी जाईल तिथे खंजीर खुपसतात हे त्यांना माहीत आहे,’ अशी जहरी टीका खोत यांनी केली आहे.

‘मला कोंबडीचोर म्हणणाऱ्या राजू शेट्टींनी चारशे एकर जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना मंत्रिपद मिळणार होतं. मात्र राजू शेट्टी यांनी स्वतःला मंत्रीपद हवे असल्याने भुयार यांना मंत्री पद मिळू दिले नाही,’ असा आरोप खोत यांनी केला आहे.