News

निसर्ग चक्रीवादळाच्या मदतनिधी वाटपात घोळ, धक्कादायक माहिती समोर

रत्नागिरी, 01 ऑगस्ट : निसर्ग चक्रीवादळाने कोकणात अक्षरशः थैमान घातले होते. अवघ्या काही तासांत होत्याचं नव्हतं झालं. बागायतदार, गोरगरीब उद्धवस्त झाले. समुद्र किनारी असलेल्या गावांबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यांना देखील या वादळाचा चांगलाच फटका बसला. या वादळात नुकसान झालेल्या गोरगरीब शेतकरी आणि ग्रामस्थांना शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. मात्र, या मदतनिधी वाटपात मोठा घोळ झाल्याचे उघड होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सुकीवली या गावात अशा प्रकारचा घोळ झाल्याचे समोर आले आहे. ज्यांचे अतोनात नुकसान झाले अशांना किरकोळ तर ज्यांच्या घरांचे केवळ 2, 3 कौले वादळात फुटले अशांना 15 हजार रुपये दिले गेल्याचे त्याच गावातील ग्रामस्थांनी उघड केले आहे. ज्यांचे खरेच नुकसान झाले असे नुकसानग्रस्त ग्रामस्थ मात्र अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

निसर्ग चक्रीवादळात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात देखील मोठे नुकसान झाले. अनेकांचे घरे, गोठे, घरांचे छप्पर उडाल, अनेकांच्या बाग देखील उध्वस्त झाल्या. शासनाने दिलेल्या मदत निधीपैकी 1 कोटीहुन अधिक निधीचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, चुकीच्या पद्धतीने पंचनामे करून मर्जीतल्या लोकांना अधिक मदत तर गोरगरीब लोकांना तुटपुंजी मदत देण्यात आले आहे. तर अनेकजण अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर येत आहे.

सुकीवली गावातील ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केला आहे. गावात जे सरकारी कर्मचारी आहेत. ज्यांच्या घरांचे अगदी किरकोळ नुकसान झाले आहे अशांना 15 /15  हजार रुपये देण्यात आलेत तर मोठे नुकसान झालेल्यांना अगदी तुटपुंजी मदत दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत निसर्ग चक्रीवादळाचे सक्षम अधिकारी आणि प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्याशी चर्चा केली असता. ‘आपण या प्रकरणाबाबत माहिती घेऊ , पंचनाम्यांमध्ये काही घोळ असेल तर सबंधितांवर कारवाई करूट, या प्रकरणाबाबत चौकशी सुरू केल्याचे ते म्हणाले.

निसर्गचक्री वादळात लोकांचे अतोनात हाल झाले. त्यात कोरोनामुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या गोरगरीब लोकांचे चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीमुळे अक्षरशः हतबल केले आहे. मात्र, त्यांना सावरण्यासाठी शासनाने दिलेल्या तुटपूंच्या मदतीमध्ये देखील अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या पंचनाम्यामुळे योग्य मदत मिळत नसेल तर ग्रामस्थांनी काय करायचे हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून चुकीच्या पद्धतीने पंचनामे करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सध्या गावकऱ्यांकडून होत आहे.