News

राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसैनिक भाजपसोबत; ‘या’ खासदाराचा दावा

अहमदनगर: ‘राज्यात वरच्या नेतृत्वाने आपला स्वतःचा स्वाभिमान घाण ठेवला आहे. मात्र आजही शिवसेनेचे कार्यकर्ते हे राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप बरोबर एक होणार याची खात्री आहे, असा दावा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. ‘ज्या राम मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले, जेलमध्ये गेले, काही लोक शहीद झाले, तेव्हा जे शिवसेनेसोबत होते, ते मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारत, राम मंदिराच्या भूमिपूजनच्या दिवशी भाजपबरोबर असतील याची खात्री आहे. त्यांचे मत परिवर्तन होताना दिसेल. याचे पडसाद महाविकास आघाडीला भविष्यात निश्चितच पाहण्यास मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यात खासदार विखे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी दूध आंदोलन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात सरकार हे जनतेच्या मनाच्या विरोधात बनवले गेले आहे. फक्त आमदारांनी व मंत्र्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आघाडी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनाच्या विरोधात हे करण्यात आले आहे . आजही खालच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नाही, असा आरोप करतानाच शिवसेनेचा कार्यकर्ता हा राममंदिराच्या मुद्द्यावर भाजप बरोबर असल्याचा दावा त्यांनी केला.

महाविकास आघाडीने करोना काळात ज्या पद्धतीने वातावरण हाताळले, ते पाहता हे सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. दूध दराबाबत राज्य सरकार उदासीन आहे. फक्त त्यांच्याकडून घोषणा केली जाते. पण दुसरीकडे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्यामुळेच आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, एखादा प्रश्न सुटायला लागल्यावर भाजप आंदोलन करते, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी नगरमध्ये बोलताना काल केला होता. त्यावर विखे म्हणाले, ‘आंदोलन करणे आमचे काम आहे. कारण आम्ही विरोधी पक्षात आहोत. तर निर्णय घेणे हे सरकारचे काम आहे व तो त्यांनी घ्यावा. आम्हाला त्याचे श्रेय नको.

प्रशासन लोकप्रतिनिधींचा आवाज दाबतंय

नगर जिल्ह्यातील वाढत असलेल्या करोना परिस्थितीवरून पुन्हा एकदा खासदार डॉ. सुजय विखे यांनी प्रशासनावर तोफ डागली. खासदारांचे प्रशासन ऐकत नसेल तर आम्ही १८ लाख मते घेऊन निवडून कशाला आलो? असा सवाल करतानाच लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचे काम प्रशासन करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. ‘पालकमंत्र्यांच्या बैठकीत कुठलीही गोष्ट मांडली जात असताना, ती मांडणाऱ्या व्यक्तीचे शिक्षण काय आहे, हे तरी लक्षात घेणे गरजेचे आहे. मात्र येथे लोकप्रतिनिधींचे ऐकले जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे,’ असेही ते म्हणाले.