बीड

मुलांच्या Online शिक्षणासाठी आईने गहाण ठेवलं मंगळसूत्र, अभ्यासासाठी घेतला TV

गदग 1 ऑगस्ट: कोरोना आणि नंतरच्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) सगळ्याचं जगणच बदललं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी आपल्या माणसांची जवळून भेट घेणही आता कठीण झालं आहे. सर्वात जास्त फटका बसला तो विद्यार्थ्यांना. शाळा बंद असल्याने सर्वांनी Online शिक्षण सुरु केलंय. मात्र आर्थिक दृष्ट्या सशक्त नसलेल्यांना इंटरनेट, मोबाईल, टीव्ही या गोष्टी घ्यायच्या कशा असा प्रश्न पडला आहे. कर्नाटकमधल्या गदग इथं मुलांच्या शिक्षणासाठी एका आईने चक्क आपलं मंगळसूत्र गहाण ठेवून टीव्ही घेतला. आईच्या धडपडीची बातमी प्रसिद्ध झाली आणि मदतीचे हात पुढे आले. ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

गदग जवळ्या एका खेड्यात कस्तूरी चालवड्डी या आपल्या दोन मुलांसोबत राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा सातवीमध्ये तर मुलगी आठवीत आहे. लॉकडाऊनमुळे दोघांचीही शाळ बंद आहे. राज्य सरकारने DDचंदना या सरकारी चॅनल वरून Online शिक्षणाची सोय केलीय.

मात्र घरात टीव्हीच नसल्याने कस्तूरी यांच्या दोन्ही मुलांचा अभ्यास काही होत नव्हता. शेवटी मुलं काही दिवस शेजाऱ्यांकडे गेलीत. मात्र दुसऱ्यांच्या घरी तरी मुलं किती दिवस जाणार. कोरोनामुळे दुसऱ्यांच्या मुलांना घरात कसं घ्यायचं म्हणून अनेक जण नाराजीचा सूरही लावत होते.

त्यामुळे कस्तुरी यांनी शेवटी स्त्रीयांसाठी सगळ्यात मौल्यवान दागिना असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचे त्यांना 20 हजार मिळालेत. त्यातून त्यांनी घरात टीव्ही घेतला आणि मुलांच्या शिक्षणाची सोय केली.

ही माहिती उघड होताच सगळीकडे चर्चा सुरु झाली. पालकमंत्री सीसी पाटील यांनी या कुटुंबाला 20 हजारांचा चेक दिला. तर स्थानिक आमदार जमीर अहमद खान यांनी 50 हजारांची मदत केली. यामुळे काही दिवसांमध्येच त्या माऊलीचं मंगळसूत्र परत आलं.