News

महाराष्ट्राकडेही देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

मुंबई, 30 जुलै: देशाच्या जडणघडणीत आजवर महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या तीनही राज्यांकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

सरहद संस्थेने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्वा’चे औपचारिक उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा, डॉ. अमोल देवळेकर, संयोजक युवराज शहा, विकास सोनताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी निमित्त 1 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या पर्वा अंतर्गत 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, कला, संस्कृती आणि समाजकारणाच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देण्यात येणार आहे.

पवार म्हणाले, ‘लाल-बाल-पाल या तिघांचे भारत देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान आहे. काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळी देशात प्लेगची साथ आली होती. त्यामुळं पुण्याला होणारं अधिवेशन मुंबईला घ्यावं लागलं होतं. तशीच परिस्थिती आजही आहे. पुण्याला होऊ घातलेला हा कार्यक्रम आज मुंबईत होतो आहे. खरंतर माणसांना माणसांपासून दूर ठेवणारा सध्याचा सोशल डिस्टन्सिंगचा काळ आहे. या काळात दोन राज्यांना जवळ आणण्याच्या उपक्रमाची सुरुवात होतेय, हे महत्त्वाचे आहे. सरहदने हाती घेतलेला हा उपक्रम म्हणजे विचारांना कृतीने जोडणारी चळवळ आहे.

लाल-बाल-पाल या तिघांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवा आयाम दिला. त्यामागे संत नामदेवांनी सुरू केलेल्या वैचारिक देवाण-घेवाणीची परंपरा आहे. ही परंपरा पुढंही सुरू राहिली. रवींद्रनाथांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी होते. त्यांनी संत तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत नेले. तसंच गीतारहस्यही बंगालीत नेलं. सुभाषबाबूंचे तर प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरही रवींद्रनाथांचा खूप प्रभाव होता. या देवाणघेवाणीच्या ऐतिहासिक पर्वाला या निमित्ताने उजाळा मिळणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बंगालला साहित्य, चित्रपट संगीत या क्षेत्राचा समृद्ध वारसा आहे. महाराष्ट्रानंही या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. या उपक्रमामुळे होणाऱ्या या आदान-प्रदानाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, असंही पवार यांनी सांगितलं.

लाल-बाल-पाल यांचं देशातील योगदान, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आदी विषयांवर भाष्य करत पवार यांनी देशातील माणसांना माणूस म्हणून जोडण्याच्या चळवळीची आज गरज असून देशाला आता नव्या वैचारिक केंद्राची गरज असल्याचेही पवार यांनी आवर्जून नमूद केले.

‘अलीकडच्या काळात रवींद्र संगीत किंवा बंगाली साहित्य हे महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण वाढले आहे. या पर्वामुळे या देवाण-घेवाणीला एक निश्चित दिशा मिळेल. या उपक्रमांतर्गत ५० पेक्षा जास्त अधिक पुस्तकांचे भाषांतर होणार आहे. साहित्यासह संगीत असेल, किंवा अन्य कला क्षेत्रांमध्येही आदान-प्रदान घडवून आणण्याचे काम केलं जाणार असल्याचं डॉ. देवळेकर यांनी सांगितलं.

‘यंदा 1 ऑगस्टपासून लोकमान्य टिळकांचे स्मृतिशताब्दी वर्षं सुरू होते आहे. 2021 हे सत्यजित रे यांचे शताब्दी वर्ष आहे, तर 2022 ही योगी अरविंदांच्या जयंतीचे 150 वे वर्ष आहे. त्यामुळेच 1 ऑगस्ट 2020 ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्व’ साजरं केलं जाणार असल्याची माहिती नवलाखा यांनी दिली.