बीड

मोदींवर टीका करणं सोडा; काँग्रेसवर लक्ष द्या; पवारांनी राहुल गांधींचे कान टोचले!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचं सोडून द्या आणि काँग्रेस वाढवण्यावर लक्ष द्या, अशा शब्दांत शरद पवारांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांनी राहुल यांना हा सल्ला दिला. गेल्या अनेक वर्षांपासून मी काँग्रेसला पाहत आहे. कोणी मान्य करा अथवा नका करू पण गांधीवाद ही काँग्रेसची मोठी ताकद आहे, तसं माझं निरीक्षण आहे. काँग्रेसमधील विविध गटांना एकत्रित आणण्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना यश आलेलं आहे. तसेच आता काँग्रेसनेही राहुल गांधींचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्याकडे संपूर्ण काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली पाहिजे, असं माझं मत आहे. अर्थात हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, असं पवार म्हणाले.

केवळ पक्ष सांभाळून चालणार नाही. तर पक्षातील विविध नेत्यांशीही राहुल गांधी यांनी सातत्याने चर्चा करायला हवी. राहुल यांनी पक्षातील सर्व नेत्यांना एकत्र आणायला हवे, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी काँग्रेसची धुरा कशी सांभाळावी? असा सवाल पवार यांना केला. त्यावर त्यांनी अत्यंत महत्वाचा सल्ला दिला. राहुल यांनी संपूर्ण देशाचा दौरा करायला हवा. सर्व राज्यातील पार्टी कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा. मागे त्यांनी असं केलं होतं. पुन्हा त्याची पुनरावृत्ती करायला हवी. पक्षातील कार्यकर्त्यांना उभारी देणं आणि त्यांना एकत्र आणणं खूप महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत, त्याविषयी विचारलं असता, खरं तर ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे. पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तिवर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली तर तुमची विश्वासहार्यता कमी होते, असं माझं निरीक्षण आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.