News

उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वत: ड्रायव्हिंग सीटवर

मुंबई: राज्यातील करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतील संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर आता राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. पुण्यातील चिंताजनक परिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली असून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते स्वत: पुण्याला रवाना झाले आहेत. स्वत: गाडी चालवत ते सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

पुणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्यानं मुंबई आणि ठाण्यालाही मागे टाकलं आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही पुण्यातील करोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व पुण्याचे जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं समजतं. आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री पुण्यातील ससून किंवा नायडू रुग्णालयाला भेट देण्याचीही शक्यता आहे.

राज्यात करोनाचे संकट असताना मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, असा आरोप सातत्यानं होत होता. ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी या आरोपांना उत्तर दिले होते. घरात राहून तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मी महाराष्ट्रात पोहोचत असतो. सातत्यानं प्रशासनाशी चर्चा करत असतो, असं ते म्हणाले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात फिरायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचा हा दौरा होत आहे.

करोनाच्या काळात उद्धव ठाकरे हे केवळ मुंबईतील कोविड सेंटरच्या पाहणीसाठी बाहेर पडले होते. श्री विठ्ठलाची शासकीय पूजा व निसर्ग वादळानंतरचा कोकण दौरा वगळता ते क्वचितच बाहेर दिसले होते. याउलट, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जाऊन आले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर टीका होऊ लागली होती.