क्राईम

भाच्यानं भोसकला मामीच्या छातीत चाकू!

30 जुलै :- एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे विक्षिप्त होत चाललेली माणसाची मनोवृत्ती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे.सध्य परिस्थितीमध्ये समजत अतिशय संतापजनक आणि माणुसकीस कलंक लावणाऱ्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडत आहे.कल्याण येथील टिटवाळा स्टेशनपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपटीबारी गावात संशयातून भाच्यानंच मामीची निर्घृण हत्या केली आहे.

जादूटोणा केल्यामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे आरोपीनं हे कृत्य केल्याचं कबूल केलं आहे.मिळालेली माहिती अशी की, गुलाबबाई मारवत वाघे (45) असे मृत महिलेचे नाव आहे. तर गुलाबबाईला ठार मारून पसार झालेला संशयखोर खूनी मोहन चंदर वाघे (28) याला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. या संदर्भात दुर्दैवी गुलाबबाईचा मुलगा गणपत मारवत वाघे (21) याच्या जबानीवरून भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गावातील वाघे कुटुंबीय मिळेल, ती मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात.गाव-खेड्यात शिक्षणाची जेमतेम सोय असल्यामुळे या मंडळींमध्ये सुशिक्षितांचा भरणा फारच कमी प्रमाणात आहे.

अशाच वाघे कुटुंबियांतील गुलाबबाईवर मोहन याने संशय घेतला होता. 8 दिवसांपूर्वी मोहन याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. गुलाबबाई हिने काहीतरी केले म्हणूनच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा मोहन याचा समज झाला होता. गेल्या 7-8 दिवसांपासून संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या मोहनच्या मनात आत्याचा काटा काढण्याचा कट शिजत होता. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास गुलाबबाई घरासमोरील अंगणात बसली होती. इतक्यात मोहन तेथे आला.

तूच काहीतरी केलेस म्हणून माझी बायको मेली, असा आरोप करत मोहन हा मामी गुलाबबाई हिच्याशी भांडू लागला. मात्र, गुलाबबाईनं त्याचे आरोप फेटाळले. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण जुंपले. काय चाललेय हे पाहण्यासाठी आसपास राहणारे लोक जमू लागले होते. मात्र संशयखोर मोहन याने घरातून लोखंडी सुरा आणला आणि मामीवरच चालवला. गुलाबबाई हिने जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहन याने छातीत सुरा भोसकलानं गुलाबबाईचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत मृत्यू झाला.

मामीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून मोहन तेथून पसार झाला.उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप गोडबोले, पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर गुलाबबाई हिचा मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे. बुधवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने मोहन वाघे याला अधिक चौकशीसाठी 4 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.