राजकारण

निमंत्रण आले तरी अयोध्येत भूमिपूजनासाठी जाणार नाही-शरद पवार

30 जुलै:- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी चिंताजनक असल्याने सध्या राज्याची परिस्थिती गंभीर आहे.आशा परिस्थितीमध्ये भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले तरी मी अयोध्येला जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याची तयारी वेगात सुरू आहे.

सध्या कोणा कोणाला निमंत्रण दिले जाणार यावरून चर्चा रंगत आहे या पार्श्वभूमीवर पवारांनी हे स्पष्ट केले आहे. ‘राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर सर्व वाद मिटले आहेत. सध्या कोरोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.