बीड

तालुक्यातील कार्यकर्त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना थेट वकिलामार्फत नोटीस

अहमदनगर: भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वकिलामार्फत नोटीस पाठवण्याचा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

भाजपची पाथर्डी येथील तालुका कार्यकारिणीची निवड १९ जुलै रोजी करण्यात आली. परंतु ही निवड पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचा आक्षेप घेत एका गटाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस पाठवली आहे. कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. ही नोटीस नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पाथर्डीचे मंडल अध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाही देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पाथर्डी तालुका अध्यक्ष व कार्यकारणी निवड पक्षाच्या घटनाविरोधी आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला करून विद्यमान आमदार यांच्या सांगण्यावरून भाजप पाथर्डी मंडळचे खोटे रेकॉर्ड तयार करून ही निवड करण्यात आली आहे. तरी, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांनी ही भाजपची पाथर्डी कार्यकारणी निवड रद्द करावी. अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही या नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही नोटीस भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे व नागनाथ गर्जे यांच्यावतीने अॅड. दिनकर पालवे यांनी पाठवले आहे.

विशेष म्हणजे नोटीस चा खर्च पाच हजार रुपये मंडळ अध्यक्ष माणिक खेडकर वाव आमदार मोनिका राजळे यांनी द्यावा, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून आता या नोटीसला काय उत्तर येते, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे शुद्धीकरण व्हावे – पाखरे

‘भाजपची पाथर्डी तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे, त्यामध्ये पाच लोक असे आहेत त्यांना जवळपास चार ते पाच वेळा संधी देण्यात आली आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते. याशिवाय सध्या भाजपचे शुद्धीकरण होण्याची गरज आहे. कार्यकारणीमध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा संघटनांमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांचाही समावेश असणे गरजेचे आहे. तसेच तालुक्याचा कारभार आमदार निवास येथून न चालता पक्षाच्या कार्यालयातून चालणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी मी राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना लक्षात आणून देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. जर त्यांनी त्याची योग्य दखल नाही घेतली तर आमच्यासमोर न्यायालय जाण्याशिवाय पर्याय नाही, असे भाजपचे पाखरे यांनी स्पष्ट केले.