बच्चन कुटुंबाकडून खूशखबर! ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त
मुंबई, 27 जुलै : बच्चन कुटुंबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) कोरोनामुक्त झाले आहेत. यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दोघीही आता जलसामध्ये (jalsa) पोहोचल्या आहेत.
12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 17 जुलैला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्याने दोघींनाही 17 जुलैला दोघींनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात (nanavati hospital) दाखल करण्यात आलं होतं. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट आता नेगेटिव्ह आला आहे. अभिषेक बच्चन याने ट्वीटवरून ही माहिती दिली आहे.
ऐश्वर्या आणि आराध्या आता जलसा बंगल्यावर पोहोचल्या आहेत. कालच मुंबई महापालिकेनं जलसावरील कंटेनमेंट झोनचा बोर्ड काढला होता. जलसाला कंटेनमेंट झोनमुक्त परिसर म्हणून घोषित केलं होतं. बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यानंतर जलसाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
11 जुलैला रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली.
ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्याला सुरुवातीला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं.
दरम्यान बच्चन कुटुंबाला लवकरात लवकर बरं वाटावा यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. अमिताभ यांनी या सर्व चाहत्यांचे आभार मानलेत. चाहत्यांच्या या प्रार्थनेमुळे ऐश्वर्या आणि आराध्या कोरोनामुक्त झाल्याचं म्हणत आता अभिषेकनेही चाहत्यांचे आभार मानलेत. आता अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.