महाराष्ट्र

दोघा भावांनी केली नर्सला चाबकाने मारहाण!

27 जुलै :- कोरोना विषाणूच्या जगव्यापी संकटात आरोग्य विभागातील प्रत्येक व्यक्ती एका ईश्वरापेक्षा कमी नाही.कोरोनाच्या चपेटीतुन प्रत्येक रुग्णाचे प्राण वाचवण्याचे काम आरोग्य विभागातील डॉक्टरांसह प्रत्येक कर्मचारी करतो आहे.स्वतःच्या जीवची कसलीही तमा न बाळगता आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे.मात्र आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यासोबत गैर वर्तन करणाऱ्या समाजतील काही घटना माणुसकीस काळिमा फासणाऱ्या आहेत.आरोग्याच्या चौकशीसाठी गेलेल्या एका परिचारीकेस दोघा भावांनी चाबकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

जत तालुक्यातल्या येळवी या ठिकाणी ग्रामपंचायतीसमोर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने ठिकाणी आरोग्याचा सर्व्हे करण्यात येत आहे. अशाच पद्धतीने जत तालुक्यातल्या येळवी याठिकाणी बाहेरून आलेल्या एका महिलेचा आरोग्याच्या तपासणीसाठी गेलेल्या एका परिचारीकेस चाबकाचे फटके देऊन मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

सुरेखा विलास विभुते असे त्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी धनाजी घोंगडे व बाळू घोंगडे या दोघा भावांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.”आईचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल दाखवा, स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याने आमची बदनामी झाली’ असा आरोप करीत या दोघांनी त्यांना शिवीगाळ करत चाबकाने मारहाण केली. येळवी गावात सोनाबाई घोंगडे (वय 50) राहतात. त्या नुकत्याच परगावी जाऊन आल्या होत्या. त्यामुळे वरिष्ठांनी आरोग्य सेविका सुरेखा विभुते यांना त्यांचा स्वॅब घेण्यासाठी त्या कोठे राहतात, याची विचारपूस करून ठेवण्यास सांगितले. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून पत्ता विचारून घेतला व त्या शुक्रवारी घोंगडे यांच्या घरी गेल्या.

त्यावेळी सोनाबाई घरी नव्हत्या. त्यामुळे आरोग्य सेविका आरोग्य उपकेंद्रात गेल्या. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर विभुते यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या झालेल्या प्रकारावर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी चौकशीचे आदेश देत दोषींवर करवाईचे आदेश दिलेत. तसेच नागरिकांनी आरोग्य सेवकांना सहकार्य करावे असेही आवाहन केले आहे