News

‘मैं पुलीस हूँ’ म्हणाला, महिलेचे दागिने घेऊन पळाला!

नगर: ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं,’ असं म्हणून एका महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व एक तोळ्याची सोन्याचे गंठण पळवून नेल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून काल रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभेदार गल्ली परिसरात राहणारी एक महिला रस्त्यावरून पायी जात असताना एका नंबरप्लेट नसलेल्या मोटरसायकलवर दोन अज्ञात व्यक्ती आल्या. या दोघांपैकी एक जण हिंदीमध्ये ‘मैं पुलिस हूँ, तुम्हारे गलीं में मर्डर हुआ हैं’ असं संबंधित महिलेला म्हणाला. त्यानंतर या दोघांनी संबंधित महिलेला गळ्यातील सोने काढून तिच्याकडे असणाऱ्या पिशवीत टाकण्यास सांगितले.

संबंधित महिलेने स्वतःच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन व एक तोळ्याची सोन्याचे गंठण काढून ते स्वतःच्या पिशवीत टाकण्यासाठी मोटरसायकलवर असलेल्या व्यक्तीकडे दिले. त्यावेळी संबंधित महिलेच्या पिशवीत सोन्याचे दागिने टाकण्याचे भासवत हातचलाखी करत हे सोन्याचे दागिने मोटरसायकलवरील दोघे जण घेऊन पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात ठकबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे पुढील तपास करत आहेत.