News

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय, युद्धपातळीवर काम सुरु

नवी दिल्ली 26 जुलै: देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केंद्राची चिंता वाढली आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लेगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. PMOच्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे.

उपचाराची दिशा, औषधं, नव्या आरोग्य सुविधा, संशोधनासाठीचे उपाय, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थचक्र  पुन्हा रुळावर आणणे अशा सगळ्याच गोष्टींवर हे तज्ज्ञ शिफारशी करणार असून त्यानंतर सरकार प्रत्येक विभागासाठी दूरगामी निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या टास्क फोर्सच्या कामकाजाबद्दल माहिती घेत असून ते सगळे अहवाल थेट पंतप्रधानांना दिले जाणार आहेत.

देशात शुक्रवारपर्यंत 1,58,49,068 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 4,20,898 टेस्ट करण्यात आल्यात

देशात 10 लाख लोकांमागे 11,485 टेस्ट केल्या जात आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंही मंत्रालयाने म्हटलं आहे.

देशात रुग्णांच्या मृत्यू दरात घसरण झाली असून सध्या त्याचं प्रमाण हे 2.35 एवढं आहे.

तर देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 63.54 एवढं आहे. मृत्यू दर आणि बरे होण्याचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे.

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 13 लाखांचा आकडा पार केला आहे. तर 8,49,431 एवढे रुग्ण बरे झाले आहेत.

देशात आत्तापर्यंत 31,358 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ताप येणं हे कोरोनाची लागण होण्याचं प्रमुख लक्षण कधी  नव्हतं. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित अभ्यासातून हे स्पष्ट होते. मार्च-एप्रिल या कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसात केवळ 17 टक्के रुग्णांना ताप होता.

दिल्लीस्थित एम्समध्ये 23 मार्च ते 15 एप्रिलपर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या 144 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. उत्तर भारतातील एका केअर सेंटरमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांची प्रोफाइल आणि रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या रिसर्चमध्ये 28 अन्य लोकांसह संचालक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी एकत्र येऊन लिहिलं आहे.