राजकारण्यांवर विक्रम गोखले संतापले!
26 July :- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मालिका, सिनेमा, वेब सीरिज यांचे शूटिंग बंद ठेवण्यात आले होते.मात्र कोरोना संक्रमणापासून बचावाकरिता आवश्यक खबरदारी घेऊन मालिका, सिनेमा, वेब सीरिज यांचे शूटिंग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.टेलिव्हिजनवर काही मालिका पुन्हा नव्याने सुरू देखील झाल्या आहेत.मात्र शूटिंग करताना काही नियमांचे पालन व्यवस्थापन, कलाकार आणि क्रू मेंबर्सकडून करणे अनिवार्य असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वाचा नियम म्हणजे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने 65 वर्ष आणि त्यापेक्षा वय असणाऱ्या कलाकारांना शूटिंग सेटवर येण्याची परवानगी नाकारली आहे.
दरम्यान सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरोध केल्याची माहिती एका मीडिया अहवालानुसार समोर आली आहे.दरम्यान केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबत कायदा करणार असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.गोखले म्हणाले, असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वयवर्षापुढील नेत्यांनीही राजीनामे द्यावे. अशी तिखट प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी निवृत्त व्हावे, असा सल्लाच गोखले यांनी दिला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की यामुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. 65 वर्षांपुढील कलाकार आपापली काळजी घेऊन काम करतील, त्यामुळे त्या्ंना काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी गोखले यांनी केली आहे.