News

आ. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणारा आरोपी अटक

पिंपरी चिंचवड – आ. चंद्रकांत पाटील यांच्या नावाने हॉस्पिटलला खंडणी मागणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.निगडी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात एकजण अडकला असून त्याचा एक आरोपी पळून गेला आहे. पोलीस पळून गेलेल्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
सौरभ संतोष अष्टुल (वय 21, रा. गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सिमकार्ड, मोबाइल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 35 हजारांचा ऐवज ताब्यात घेतला आहे.आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने एका हॉस्पिटलला फोन करून गोरगरिबांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास बघून घेण्याचीही भाषा केली.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते.

मात्र, आपला फोन तीन आठवड्यांपूर्वीच चोरीला गेला असल्याचे त्या व्यक्‍तीने सांगितले होते. पोलिसांनी आणखी तपास करून एकाला अटक केली आहे.असा अडकला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात -आरोपीने काही दिवसांपूर्वी एक नारळ पाणी वाल्याचा मोबाइल फोन चोरला.होता व त्याच्या आधारे त्याने फोन करून पैसे मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने निगडी येथील एका हॉस्पिटल मधिल एका डॉक्टरांना फोन करून 25 लाख रुपयांची मागणी केली.भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने ही खंडणी मागण्याचा आरोपीने प्रयत्न केला होता. रुग्णालय प्रशासनाने याची शहानिशा करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क केला.

पाटील यांनी आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचा फोन कोणीही केला नसल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हॉस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला अदखलपात्र तक्रार करून त्यानंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला.होता आरोपीने अनेकांना फोन करून अशा प्रकारे खंडणी मागितली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी एका आर्किटेक्टच्या नावाने आरोपीशी संपर्क केला.तडजोड करून 21 हजार रुपये देण्याचे ठरवले. पैसे घेण्यासाठी आरोपीला एका चौकात बोलावले. आरोपी त्याच्या साथीदारासोबत पैसे घेण्यासाठी आला.आरोपीला पैसे मोजण्यात गुंतवून ठेऊन पोलिसांनी त्याला पकडले. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच त्याचा एक साथीदार पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.