शरद पवार नाशिकला पोहोचण्याआधीच ‘या’ अधिकाऱ्याची उचलबांगडी
नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेतील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक राजेंद्र त्र्यंबके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्र्यंबके हे मलेरिया तज्ञ असतानाही त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाचा पदभार होता. करोनाचा उद्रेक झाला असतानाही महापालिकेत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी नव्हता. टोपे आणि पवार यांच्या आजच्या आढावा बैठकीत यावरून वादंग होण्याची शक्यता होती. त्यापूर्वीच शासनाने नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पालिकेला पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे.
करोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडत असल्याचं कारण देत राज्यातील अनेक महापालिकांच्या आयुक्तांच्या बदल्या मागील तीन महिन्यात सरकारनं केल्या आहेत. नाशिकची परिस्थिती काहीशी वेगळी होती. इथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीच नव्हता. ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न नागरगोजे यांच्या नियुक्तीद्वारे करण्यात आला आहे.
राज्यातील करोना साथीची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. नुकताच त्यांनी सोलापूरचा दौरा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. आज ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देणार असून तेथील अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
सरकारमधील मंत्री वगळता अन्य नेत्यांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी हजेरी लावू नये, असं परिपत्रक सरकारनं काढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पवारांच्या दौऱ्यावर विरोधी पक्ष भाजपनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजेश टोपे यांच्या नावानं पवार हे बैठक घेणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
सांगितले मुख्यमंत्री, अवतरणार पवार!
नाशिक शहरातील लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री ठाकरे नाशिकला येणार होते. त्यासंदर्भातील सूतोवाच खुद्द पालकमंत्री भुजबळ यांनीच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री येणार अशी चर्चा सुरू असताना, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पवारांनी जिल्ह्यात एंट्री घेत लीड घेतला आहे. त्यामुळे घोषणा ठाकरेंच्या दौऱ्याची, पण अवतरणार पवार अशी स्थिती पहायला मिळत आहे.