महाराष्ट्र

कोरोनाबाधित रुग्णालाच दिला डिस्चार्ज!

परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील खळबळजनक प्रकार


परभणी, दि.22 :- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून पुर्णेतील एका कोरोनबाधित रुग्णालाच अवधानाने बुधवारी दुपारी डिस्चार्ज दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पूर्णेतील एक महिला 18 जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमीट झाली. वैद्यकीय अधिका-यांनी त्या महिलेचा स्वॅब तपासला असता तो पॉझिटीव्ह निघाला. त्यामुळेच त्या महिलेवर उपचार सुरू झाले होते.असे असतांना रुग्णालय प्रशासनाने त्या महिलेस बुधवारी दुपारी अचानक डिस्चार्ज दिला.

त्यामुळे कुटुंबियांनी त्या महिलेस वाहनाद्वारे पूर्णेस घरी नेले. विशेष म्हणजे त्या परिसरातील उत्साही नागरिकांनी त्या महिलेच्या गाठीभेटी सुरू केले काहीनी स्वागत केले. हे सत्र सुरू असतांना जागरूक नागरिकांना पॉझिटीव्ह असणा-या महिलेस तीन दिवसांत डिस्चार्ज मिळाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले. तेव्हा एकूण गोंधळ निदर्शनास आला. दरम्यान, त्याच कक्षात आडनावात साम्य असणारी गंगाखेडातील एक महिला उपचार घेत होती. त्या महिलेचा स्वॅब निगेटीव्ह आला. त्या महिलेस डिस्चार्ज देण्या ऐवजी पूर्णेतील या महिलेस डिस्चार्ज दिला गेला असावा, अशी माहिती हाती आली आहे.