बीड

छत्रपती शिवरायांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान; भाजप, भिडेंचं तोंड बंद का?: शिवसेना

मुंबई: राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्याबद्दल राज्यसभेत समज दिल्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाचा दिल्ली दरबारी अपमान होत असताना भाजप आणि संभाजी भिडे यांची तोंड अद्याप बंद का? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी जय शिवाजी, जय भवानीच्या घोषणा दिल्या. त्यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी समज दिली होती. सभागृहात कोणत्याही घोषणा करायच्या नसतात. तुमचं हे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात येत असून यापुढे अशी विधाने सभागृहात करू नका, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला घेरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे, असा टोला लगावतानाच संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणाही नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी भाजपवर टीका करतानाच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनाही याप्रकरणात धारेवर धरले आहे. तर लॉकडाऊनमुळे सांगली, सातारा आधीच बंद आहे, हे राऊत यांना माहीतही नाही का? असा सवाल करत शिवप्रतिष्ठानने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला कुणाच्या परवानगीची गरज नाही, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आम्ही उदयनराजेंसाठी आंदोलने केली आहेत. उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही कायम आहोत, असंही प्रतिष्ठानने म्हटलं आहे.