बीड

गेवराई-आज तिघांचा मृत्यु!

22 July बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षात उपचार घेणाऱ्या गेवराई शहरातील एका 68 वर्षीय महिलेचा बुधवारी (दि.22) सकाळी मृत्यू झाला तर याच तालुक्यातील बागपिंपळगाव येथील मंगळवारी स्वॅब घेतलेल्या एका 70 वर्षीय रुग्णाचा घरी नेल्यानंतर सायंकाळी मृत्यू झाला. दरम्यान रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने अनेकजण अंत्यसंस्काराला उपस्थित होते. मात्र बुधवारी पहाटे संबंधित रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

गेवराई शहरातील गजानन नगर भागातील एका महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. दरम्यान आणखी एका रुग्णाचा कोरोना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, गेवराई तालुक्यातील बागपिंपळगावच्या 70 वर्षीय वृद्ध रुग्णाचा मंगळवारी बीड येथे स्वॅब घेण्यात आला होता. तेथून त्या रुग्णाला घरी आणण्यात आले होते. यानंतर सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.

त्यानंतर बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती बीडहून त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली.तोपर्यंत त्याचा अंत्यविधीही झाला होता.यावेळी त्याच्या अंत्यविधीला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते. अंत्यविधीसाठी कोण कोण उपस्थित होते यांची माहिती प्रशासनाने मागितली आहे.

तहसिलचे पेशकार यांचा आजारामुळे मृत्यू गेवराई तहसिल कार्यालयात कार्यरत असणारे पेशकार लतीफ शेख (50) यांचा मंगळवारी स्वॅब हा पाठविण्यात आला होता. त्यांचा रिपोर्ट बुधवारी निगेटिव्ह आला होता. त्यांचे गेलेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्याने त्यांनी दवाखान्यात दाखवून औषध गोळ्या सुरू ठेवल्या होता परंतु त्यांचा बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.परंतु त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे अद्याप समजले नसल्याने गेवराई शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.