News

उदयनराजेंनी घेतली इंग्रजीतून शपथ; दिल्या घोषणा, सभापतींनी सुनावले

नवी दिल्ली: राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज बुधवारी (२२ जुलै) राज्यसभा सदस्यत्वाची (खासदारकीची) शपथ घेतली. यांमध्ये भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी देखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उद्यराजे यांनी आपली शपथ इंग्रजी भाषेतून घेतली. शपथेबरोबर उदयनराजे यांनी ‘जय हिंद’, ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी- जय शिवाजी’, असा घोषणा दिल्या. शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू  यांना उदयनराजे यांना समज दिली.

हे हाऊस नाही हे माझे चेंबर आहे. सदनातील नवीन लोकांना सांगतो. शपथ घेताना कोणतीही घोषणा देऊ नये, ते काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. सभागृहात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या, असे व्यंकय्या नायडू यांना सांगावे लागले.

आज कोणी-कोणी घेतली शपथ?

भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, शिवसेनेच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपचे भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा नेत्यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. रामदार आठवले आणि उदयनराजेंनी इंग्रजी भाषेतून, तर शरद पवार यांनी हिंदीमधून, कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मात्र मराठीतून शपथ घेतली.

फौजिया खान यांना करोनामुळे येता आले नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान या देखील आज शपथ घेणार होत्या. मात्र त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या आजच्या शपथविधीला हजर राहू शकल्या नाहीत.

ज्योतिरदित्य, दिग्विजय सिंहांनीही घेतली शपथ

मध्य प्रदेशात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सामील झालेले नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेसचे सरकार उलथवून शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याच्याबरोबरच मध्य प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही आज शपथ घेतली.