बीड

अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला धक्का; विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला करोना

मुंबई: विधानसभेचे पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

येत्या ३ ऑगस्टपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अधिवेशनाच्या तयारीसाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांना विधानभवनात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं सरकारला या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. पटोले यांच्या स्वीय सहाय्यकासह त्याच्या दोन जवळच्या नातेवाईकांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच, या घडामोडींनंतर नाना पटोले यांचं कार्यालय सील करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. ‘लोकमत’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग सातत्यानं वाढत आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनाही करोनानं गाठलं आहे. सरकारमधील अनेक मंत्री, खासदार व आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. ते सगळे यातून बरे झाले असले तरी आता विधानभवनातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.