बीड

संयम सुटला! कामावर जाऊ द्या, संतप्त प्रवाशांचा उद्रेक; नालासोपाऱ्यात रेलरोको

मुंबई: करोनामुळे गेली चार महिने घरातच थांबावं लागलेल्या प्रवाशांचा आज अखेर संयम सुटला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही रेल्वेने प्रवास करण्याची मुभा द्या. एसटीची सेवा कमी पडतेय असं सांगत शेकडो संतप्त प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. या प्रवाशांनी आधी नालासोपारा एसटी स्टँडमध्ये जोरदार आंदोलन केले. त्यानंतर रेल्वे रुळावर घुसून ठिय्या आंदोलन करत रेल्वे रोको केला. अचानक झालेल्या या गोंधळामुळे रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला घटनास्थळी पोलिसांची ज्यादा कुमक मागवण्यात आली असून अजूनही नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचा गोंधळ सुरू आहे.

नालासोपारा एसटी स्टँडमधून कामावर जाणाऱ्यांसाठी रोज १०० ते १५० एसटी सोडल्या जात आहेत. आज बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून एसटी सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा संयम सुटला आणि या संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनता एक एक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला. आंदोलक प्रवाशांनी तोंडाला मास्क लावलेला असला तरी अचानक शेकडो प्रवाशी एकत्र येऊन घोषणाबाजी करू लागल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वे स्थानकाच्या दिशेने कूच केली. रेल्वे स्थानकाबाहेर लावलेले बॅरिकेड्स तोडून संतप्त प्रवाशांचा लोंढा अचानक रेल्वे स्थानकात घुसल्याने ड्युटीवरील पोलिसांचीही तारांबळ उडाली.

प्रवाशांनी घोषणाबाजी देतच रेल्वे स्थानकात प्रवेश करत रेल्वे रुळावर उतरून ठिय्या आंदोलन केलं. आम्हीही कामावर जातो. आम्हालाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे रेल्वेतून प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत या संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोको केला. शेकडो प्रवासी रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वेचा खोळंबा झालाच पण रेल्वे प्रशासनाला या प्रवाशांना हटविण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली.