कंगनाच्या वक्त्यव्यावर तापसी संतापली!
22 जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यास वैतागून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.सुशांतने केलेल्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक बड्या दिग्दर्शकांनी,अभिनेत्यांनी सुशांतची केलेली पिळवणूक असल्याचे कंगनाने अनेकदा सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.
अनेक मोठ्या प्रतिष्ठित कलावंतांची सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. तो गेल्यापासून या इंडस्ट्रीत असलेला नेपोटिझम चर्चेत आला. त्यानिमित्ताने आऊटसायडर्सना मिळणारी वागणूक आणि त्यांची होणारी पिळवणूक यांना वाचा फुटली. यात मोलाची भूमिका बजावली आहे कंगना रनोटने. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून दोन व्हिडिओ पोस्ट करत या इंडस्ट्रीत कसा नेपोटिझम आहे. सुशांतला आत्महत्येला कसं प्रवृत्त केलं गेलं. सलमान खान, जावेद अख्तर यांचे संदर्भ देऊन बळी तो कान पिळी कसं सुरू आहे याची माहिती कंगनाने दिली. पण आता प्रकरण त्याही पुढे केलं आहे.एका इंग्रजी वाहिनीला मुलाखत देताना कंगनाने नेपोटिझम, आऊटसायडर्स यावर चर्चा केलीच. पण ती करत असताना तिने बोलता बोलता अभिनेत्री तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर यांचाही उल्लेख केला. तो सहज केला असता तर ठीक आहे. पण तसं झालं नाही. तो करत असतानाच या दोन अभिनेत्री दुय्यम दर्जाच्या असून ‘गरजू आऊटसायडर्स’ असल्याची टिप्पणी तिने केली.
या मुलाखतीनंतर काही दिवस शांततेत गेले. कंगनाच्या टिप्पणीनंतर तापसी, स्वरा व्यक्त होतील असं वाटत होतं. पण तापसी शांत होती. तोवर सगळं आलबेल होतं.
सोमवारी तापसी कशी चांगली आभिनेत्री आहे. तिने कसे सिनेमे केले आणि ते कसे हिट झाले याचा दाखला एका प्रसिद्ध पत्रकाराने ट्विटरवर दिला. तिच्या चित्रपटांनी कशी तीनशे कोटींची कमाई केली तेही यात लिहिलं गेलं. याला रिट्वीट करताना तापसीने लिहिलं, कदाचित म्हणून मी बी ग्रेड अभिनेत्री असेन. ही टिप्पणी करताना तिने कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नव्हता. पण ही कमेंट वाचून कंगना रनौतची डिजिटल टीम खवळली. त्यानंतर वाद पेटला. मग हा वाद कुणी किती हिट दिले यावर गेला. तापसीचे सिनेमे कसे सोलो नव्हते. हे सांगितलं गेलं. यावर तापसीनेही आपली मतं मांडली.