पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन वाढणार का? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
पुणे, 20 जुलै : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान होत असलेल्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘पुणे शहरात लवकरच कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात येईल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात थोडा वेळ लागेल. मात्र व्हेंटिलेटर,बेड्स कमी पडणार नाहीत असं नियोजन आहे. लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे, असं आम्ही कुणीच मानत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केसेस वाढल्या. आता पुणे शहर आणि ग्रामीण भागात मृत्यू दर कमी झाला आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, ‘लॉकडाऊन काळात इंडस्ट्री सुरूच आहेत. याबाबत एकही तक्रार नाही. यापुढे आम्ही कंटेन्मेंट झोन्सवर लक्ष केंद्रित करू. पुणे जिल्ह्यात आगामी काळात लॉकडाऊन वाढवावा अशी परिस्थिती येणार नाही. मात्र काहीना काही उपाय योजना कराव्या लागतील जसं फक्त रविवारी लॉक डाऊन. मात्र अजून याबाबत निर्णय झालेला नाही,’ असं नवलकिशोर राम यांनी म्हटलं आहे.
23 जुलै नंतरच्या नंतर पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन नाही, गर्दी कमी करण्यासाठी उपाय योजना करणार आहोत. तसंच प्रतिबंधित क्षेत्रात मात्र निर्बंध राहतील, असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.