News

खासगी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह, नगरमध्ये धक्कादायक प्रकार

अहमदनगर, 20 जुलै : शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेह रुग्णाच्या जवळच ठेवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, या महिला रुग्णाचा खासगी हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह आला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना तपासल्यानंतर  वापरलेले हॅण्डग्लोज आणि पीपीई किट उघड्यावर फेकलेले जातात. अनेकदा सांगूनही सिव्हिल प्रशासनाने कुठलीही दाखल घेतली नसल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी व्हिडिओ तयार केला आहे.

एका व्यक्तीचा खासगी रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला असून, याच व्यक्तीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात केलेल्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह असा प्रश्न नातेवाईकांसमोर निर्माण झाला आहे.

नगर तालुक्यातील एका गावातील 45 वर्षीय महिलेच्या छातीत दुखू लागले. पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोविड-19 ची चाचणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला. खाजगी प्रयोगशाळेतील डॉक्टरांनी सकाळी दहा वाजता महिलेच्या स्त्रावाचा नमुना घेतला. त्याचा अहवाल शनिवारी आला. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नातेवाईकांनी संबंधित महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणले.

जिल्हा रुग्णालयाचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला. जिल्हा रुग्णालयाने संबंधित महिला कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला. नातेवाईकांनी खासगी प्रयोगशाळेतील अहवालाचा आधार घेऊन महिलेला खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण, शासकीय रुग्णालयातील अहवाल निगेटिव्ह आल्याने पुढे उपचार सुरू ठेवावेत की रुग्णाला घरी घेऊन जावे, असा प्रश्न आता नातेवाईकांसमोर आहे.