धक्कादायक बातमी! महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 133 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
मुंबई, 19 जुलै: राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून पोलिस दिवस-रात्र आपलं कर्तव्य बजावत आहे. रस्त्यावर ड्युटी करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा अनेकांशी संपर्क येत आहे. परिणामी कोरोनाबाधित पोलिसांचा संख्याही वाढत आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत तब्बल 133 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात 19 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर 2 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यात 184 कोरोनाबाधित पोलिस अधिकारी आणि 1305 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 87 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात 7 पोलिस अधिकारी तर 80 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोना संकटाच्या काळात पोलिस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलिस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ब्रिटनपेक्षाही जास्त
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ही ब्रिटन देशातील एकूण रुग्णांपेक्षा जास्त आहे.जर महाराष्ट्र हा देश असता, जर जगातील एकूण कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत 10वा क्रमांक असता. राज्यात शनिवारी 8 हजार 348 नवे कोरोना रुग्ण सापडले.
राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 144 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांचा आकडा हा 11हजार 569वर पोहचला आहे. तर, राज्यात 3 लाख 937 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर, 1 लाख 65 हजार 663 रुग्ण निरोगी झाले आहे.