महाराष्ट्र

एस. टी. महामंडळानं घेतला मोठा निर्णय

17 July :- राज्यभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या काहारामुळे मुक्त संचार करणे कठीण झाल्याने नुकसानात असलेल्या एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे.महामंडळानं घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

एसटी महामंडळानं याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे.

त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.