महाराष्ट्र

बकरी ईद बाबत गृहमंत्रीचं आवाहन!

17 July :- दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा चिंतेचा विषय बनला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.यामुळे गेल्या चार महिन्यात आपण सर्व धर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत.

कोरोनाविषाणूचं वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता येणारी बकरी ईद सावध व साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधींसह मुस्लिम बांधवांना केले होते. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन केले आहे.


बकरी ईद साजरी करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत.
*राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
*सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
*नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.
*बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
*बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
*कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.