भाजपचं ‘मिशन महाराष्ट्रा’? देवेंद्र फडणवीस उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार
नवी दिल्ली 17 जुलै: विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर शनिवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. महाराष्ट्र आणि दिल्लीतही कोरोनाचा उद्रेक असतांना फडणवीसांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा करणं याला महत्त्व प्राप्त झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही दिल्लीत पोहोचले आहेत. आज फडणवीसांनीअमित शहांची भेट घेतली. या भेटीत राज्यातली कोरोनाची स्थिती आणि राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याची महिती सूत्रांनी दिली.
मध्यप्रदेशची सत्ता खेचल्यानंतर आता भाजपने राजस्थानवर डाव टाकला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ‘मिशन महाराष्ट्राच्या’ कामगिरीसाठीच फडणवीस दिल्लीत असल्याचीही चर्चा आहे.
ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट या दोन नेत्यांच्या बंडानंतर काँग्रेसला हादरे बसले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अनेक असंतुष्ट नेते आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची बांधणी सुरू असतांनाच अजित पवारांनी भाजपशी दोस्ती करत सत्ता स्थापन करणं यामुळे खळबळ उडाली होती. नंतर ते बंड शांत झालं.
तशी कुठलीही घटना घडू नये यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रयत्नशील आहेत. मात्र सत्तेतल्या तिनही पक्षामध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचं अनेकदा पुढे आलं आहे. त्यामुळे कोरोनासारख्या महाभयंकार साथीशी लढत असतानाच ठाकरे सरकारला राजकीय पातळीवही तेवढेच दक्ष राहावं लागेल असं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलं आहे.