News

पुण्यासाठी मोठी बातमी! करोनावर मात करून १७३ पोलीस पुन्हा ड्युटीवर

पुणे – करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झुंजणाऱ्या पुणे जिल्हा प्रशासनासाठी व पोलिसांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शहर पोलीस दलातील १७३ अधिकारी व कर्मचारी करोनावर मात करून पुन्हा एकदा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. पुणे पोलीस दलातील २३६ जणांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. त्यात १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शहरात गेल्या चार ते साडेचार महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दररोज सर्वसाधारण हजार ते दीड हजार नागरिकांना या आजाराची लागण होत आहे. या आजाराचा प्रसार कमी व्हावा, यासाठी विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा, महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. काहीही काम नसताना कोणीही घरातून बाहेर पडू नये, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून पोलिस रस्त्यावर उतरून आपली ड्युटी करत आहेत.

लॉकडाउनमुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी राज्य सरकारने लॉकडाउन रद्द करत अनलॉक १ सुरू केला होता. मात्र या काळात मोठ्या संख्येने नागरिकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केल्याने करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना या आजाराची लागण होऊ नये, यासाठी गेल्या चार महिन्यापासून पोलिस प्रशासन रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कठीण काळात दिवस रात्र सेवा देणाऱ्या पोलिसांना देखील करोनाची लागण झाली आहे.

पोलिस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी यांना करोनाची बाधा होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक अधिकारी नेमला आहे. कर्मचाऱ्यांची देखभाल करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एका सहाय्यक आयुक्तांची नेमणूकही केली आहे. त्यानुसार लागण झालेल्या सर्व पोलिसांची काळजी घेतली जाते. तर कर्मचारी व अधिकारी यांना मास्क, सॅनिटायझर तसेच सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबत पोलिस लाईनमध्ये देखील लक्ष देऊन काम केले जात आहे. आवश्यक ती काळजी घेतल्यानंतर देखील आतापर्यंत पोलिस दलातील २३६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २०७ कर्मचारी आणि १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ११ अधिकारी उपचार घेऊन बरे देखील झाले आहेत. तसेच १६२ जवळपास कर्मचारी उपचारानंतर ठणठणीत होऊन पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. मात्र दुर्दैवाने तीन कर्मचाऱ्यांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांसाठी राखीव खाटा

करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक असलेले उपचार तातडीने मिळावेत, यासाठी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये लवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज, बालेवाडी येथील लिक्मी सेंटर, निकमार, भारती हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, सिंहगड इन्स्टिट्यूट येवलेवाडी, पुणे महापालिकेचे नायडू हॉस्पिटल, नवले अशा हॉस्पिटल मध्ये हे उपचार घेतले जात आहेत.