राज्याच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांना करोना
लातूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ते लातूरमध्येच उपचार घेत आहेत. मात्र, त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून निलंगेकरांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यांना सर्दी, खोकलाही होता. त्यामुळं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांची करोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या कुटुंबीयांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. ९१ वर्षीय निलंगेकर यांना मधुमेहाचाही त्रास आहे. त्यामुळं त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
शिवाजीराव पाटील हे लोकांमध्ये वावरणारे नेते आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या त्यांच्याकडं राबता असतो. मात्र, करोनाच्या काळात ते घरातच होते. वयोमानामुळं कुटुंबीयांकडून त्यांची काळजीही घेतली जात होती. तरीही त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक नेते व मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात लोकांना मदत करताना संपर्कात आल्यामुळं त्यांना बाधा झाली होती. सुरुवातीला राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. बऱ्याच दिवसांच्या उपचारानंतर ते ठणठणीत बरे झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोना पॉझिटिव्ह आले होते. नांदेडहून मुंबईला येऊन त्यांनी उपचार घेतले होते. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही करोनामुळं रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. या तिघांनीही करोनावर मात केली आहे.