जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी
नवी दिल्ली, 14 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (Reliance Industries Ltd.) चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी जगभरातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज (Google Co-Founder Larry Page) यांना मागे टाकत त्यांनी हे स्थान कमावले आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स (Bloomberg Billionaire Index) च्या मते, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 72.4 अब्ज डॉलर झाली आहे. याआधी मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात मोठे गुंतावणूकदार आणि हाथवे बर्कशायरचे वारेन बफे यांची जागा घेतली होती, जे की आठव्या स्थानावर होते. जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये आशिया खंडातील असणारे मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्ती आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये (RIL Share Price) सतत फायदेशीर गुंतवणूक होत आहे, हे रियायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. मार्चनंतर आतापर्यंत रिलायन्सच्या शेअर्समध्ये आतापर्यंत दुप्पट वाढ झाली आहे. रिलायन्स समुहाची टेक्नॉलॉजी कंपनी असणाऱ्या जिओ प्लॅटफॉर्म्स (Jio Platforms)मध्ये जगभरातील मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. यावर्षी या गुंतवणुकीची सुरुवात फेसबुक (Facebook) सारख्या मोठ्या कंपनीपासून झाली होती.
गेल्या 3 महिन्यात जिओ प्लॅटफॉर्ममध्ये एकूण 12 विदेशी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. फेसबुक, सिल्ह्वर लेक पार्टनर्स, विस्टा, जनरल अटलांटिक, KKR, मुबाडाला, ADIA, TPG, L Catterton, PIF यांसारख्या एकूण 12 विदेशी कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये आतापर्यंत गुंतवणूक केली आहे. भागीदारी विकून जिओने आतापर्यंत 117,588.45 कोटींची कमाई केली आहे. आरआयएलला आजतागायत जिओ प्लॅटफॉर्मच्या 25.09 भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे.
श्रीमंतांच्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत जेफ बेजोस
श्रीमंतांच्या या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर Amazon चे सीईओ जेफ बेजोस आहेत. त्यांची नेटवर्थ 184 अब्ज डॉलर आहे. यानंतर या यादीमध्ये अनुक्रमे बिल गेट्स (नेटवर्थ- 115 अब्ज डॉलर), बर्नार्ड अरनॉल्ट (नेटवर्थ – 94.5 अब्ज डॉलर), मार्क झुकरबर्ग (नेटवर्थ – 90.8 अब्ज डॉलर), स्टेले बालमर (नेटवर्थ-74.6 अब्ज डॉलर) आणि सहाव्या क्रमांकावर मुकेश अंबानी (नेटवर्थ 72.4 अब्ज डॉलर) आहेत.