महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती?; जयंत पाटील म्हणाले…
मुंबई:- महाराष्ट्रातही राजस्थानची पुनरावृत्ती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही आणि फुटला तरी तीन पक्षांच्या ताकदीसमोर तो निवडूनच येणार नाही. त्यामुळे कोणताही आमदार राजकीय विजनवासात जाण्याचं धाडस करणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आहे. तिन्ही पक्ष एकदिलानं काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. आघाडीचा एकही आमदार फुटू शकत नाही. फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिल. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असं सांगतानाच महाविकास आघाडीचाच काय? भाजपचाही आमदार फुटणार नाही. फुटला तरी तो आमच्या ताकदीसमोर निवडून येणार नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आव्हानाचाही समाचार घेतला. भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना ६०-६५ जागावरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा ते अधिक जागा जिंकूच शकत नाहीत, असा टोला पाटील यांनी लगावला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले असते तर राष्ट्रवादीला २० आणि काँग्रेसला १० जागा मिळाल्या असत्या असं सांगतानाच सर्व पक्षांनी एकदा स्वतंत्र लढावंच असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. त्यावर जयंत पाटलांनी हा टोला लगावला आहे.
राजस्थानात काय घडलं?
राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे तरुण नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्याने आज अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदास काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. ही घोषणा पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली. या बरोबरच काँग्रेसने आमदार गोविंदसिंह डोटासरा यांची राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बंडखोर सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तातडीने राजभवनमध्ये जाऊन राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली आणि त्यांना या कारवाईची माहिती दिली.