News

खोपोलीतील स्टील कारखान्यात भीषण स्फोट, कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले

खोपोली: खोपोली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जखमी झाला आहे. जखमी कामगाराला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यात मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत. स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर अक्षरश: हादरून गेला.\

दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) व प्रमोद दूधनाथ शर्मा (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) असं जखमी कामगाराचं नाव आहे. मृत कामगारांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. तर, जखमी सुभाष वांजळे यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंडिया स्टील ही खोपोलीतील जुनी व मोठी कंपनी आहे. भंगारमधील लोखंड वितळवण्याचे काम येथील कारखान्यात चालते. यापूर्वीही काही वेळा येथे लहान मोठे स्फोट झाल्याचे सांगितले जाते. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस व अन्य यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.