बीड

धक्कादायक! तब्बल 3 महिने चालवत होता SBIची खोटी शाखा, खरे अधिकारी आले आणि…

चेन्नई, 13 जुलै : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) खोटी शाखा तब्बल तीन महिने सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूमध्ये घडला. या प्रकरणी तामिळनाडू पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. मुख्य म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका हा निवृत्त बॅंक कर्मचाऱ्याचा मुलगा होता.

तामिळनाडू येथील पनरूती येथील तीन तरुणांनी नोकरी नसल्यामुळे पैसे कमवण्यासाठी खोटी SBIची शाखा सुरू करण्याचा प्लॅन आखला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अंबिटकर यांनी दिली. या सगळ्याचा प्रमुख होता कमल बाबू. कमलनं पैसे कमवण्यासाठी आपल्या दोन मित्रांसा सोबत घेऊन तीन महिन्यांपूर्वी ही खोटी शाखा सुरू केली. कमलसोबत अटक करण्यात आलेले दोघे बॅंकेच्या खोट्या पावत्या, चलान आणि बँकेशी संबंधित इतर कागदपत्रं छापण्याचे काम करायचे.

कमलची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळले की, पैसे कमवण्यासाठी त्यानं खोटी शाखा सुरू केली. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडीलांचे निधन झाले होते, तर आई बॅंकेतील निवृत्त कर्मचारी होती. लॉकडाऊनमुळे कमललाही काम मिळत नव्हते. अशा परिस्थितीत त्यानं खोटी शाखा सुरू करण्याचा प्लॅन रचला. मात्र एका ग्राहकामुळे त्याचा हा प्लॅन फसला.

पनरुतीमधील एका ग्राहकांना या नवीन शाखेबाबतची माहिती मुख्य शाखेतील व्यवस्थापकांना दिली. यावेळी शहरात तिसरी शाखा कधी सुरू करण्यात आली, याबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी कळले की, पनरुतीमध्ये SBIच्या केवळ दोनच शाखा आहेत. त्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी थेट या खोट्या शाखेत भेट दिली.

अधिकारी जेव्हा बॅंकेत पोहचले तेव्हा त्यांना अगदी SBIच्या शाखेप्रमाणेच ही शाखा उभारण्यात आली होती. त्यामुळे काही क्षण अधिकारीही चक्रावले. मात्र त्यांनी कागदपत्रे मागवल्यानंतर, कमल घाबरला. एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या तपासणीत असे आढळून आले की, तीन महिन्यात कोणत्याही ग्राहकाची फसवणूक करण्यात आलेली नाही. तरी सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.