News

कोरोनामुळे कर्तव्यदक्ष पोलिसाला गमावलं!

जालना, 13 जुलै : जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून आज कोरोनामुळे पोलिसाचा पहिला बळी गेला आहे. जालन्यातील एका पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुनील सुर्वे असं या पोलीस हवालदाराचा नाव असून ते बॉम्ब शोधक व नाशक पथकात कार्यरत होते. सुर्वे हे आंतरजिल्हा चेकपोस्टवर कोरोना ड्युटीवर असताना 1 जुलै रोजी कोरोना पॉजिटिव्ह आले होते.

दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयातून औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणी उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा आता 1047 वर पोचला असून आतापर्यंत 40 जणांचा बळी गेलाय. दरम्यान, पोलिसाचा कोरोनामुळे बळी गेल्याने जालन्यातील पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून भीतीचं वातावरण पसरले आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 254427 वर

दरम्यान, राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात गेल्या 24 तासात Active रुग्णांच्या संख्येने 1 लाखांचा ट्प्पा पार केला. नवे 7827 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या 254427 एवढी झाली आहे. तर Active रुग्णांची संख्या 1 लाख 3 हजार 516 एवढी झाली आहे.

रविवारपर्यंत 3340 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या 10289 एवढी झाली आहे. मुंबईत 1243 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 92988 एवढी झालीय. तर 44 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5288 एवढी झाली आहे. राज्यात 31904 टेस्ट करण्यात आल्यात त्यात 7827 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.