महाराष्ट्र

लॉकडाऊन बाबत पवारांचा मोठा खुलासा

11 July :- कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी संख्या, नागरीकांनी स्वयंशिस्तीचे न केलेले पालन ,प्रशासनाच्या सूचनेकडे नागरिकांनी केलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाकडूनही ज्या सूचना आल्या होत्या, त्याचा व्यापक विचार करूनच कोरोनावर मात करण्याच्या उद्देशानेच पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्येही 3 जुलै ते 23 जुलै या कालावधीत पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

मात्र, या निर्णयामुळे पुणेकर नाराज झाले असून या निर्णयाला व्यापारी संघानेही कडाडून विरोध केला आहे. यावर आता अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत खुलासा केला आहे. पुण्याच्या लॉकडाऊन संदर्भात आपण घेतलेला निर्णय हा एकतर्फी नसून तर व्यापक लोकहित व प्रशासनाकडून आलेल्या माहिती व सूचनांचा विचार करुनच हा निर्णय घेतलेला आहे,या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य सचिव यांच्यासह सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनाही याची कल्पना होती. फोनवरुन जे लोकप्रतिनिधी उपलब्ध झाले त्यांनाही याची कल्पना दिली होती. लॉकडाऊनच्या संदर्भात पुण्याच्या महापौरांनाही याची माहिती दिली होती.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची शासनास आवश्यकता आहे. राज्य शासन म्हणून आम्हीही सर्व बाजूंचाच विचार नेहमी करत असतो. मात्र, हे करताना व्यापक जनहिताला प्राधान्य द्यावे लागते, प्रसंगी कठोर निर्णयही घ्यावे लागतात.लॉकडाऊन बाबत असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.