बीड

अजित पवारांच्या निर्णयाला भाजपचा विरोध, गिरीश बापटांनी घेतली आक्रमक भूमिका

पुणे, 11 जुलै : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात 13 जुलैपासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र काही घटकांकडून विरोध होत आहे. पुणे व्यापारी संघानंतर पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

‘मास्क लावला नाही, शरीररिक अंतर पाळले नाहीतर कडक कारवाई करा, पण 3 टक्के प्रतिबंधीत क्षेत्रातील लोकांसाठी 97 टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. केवळ अधिकाऱ्यांवर विसंबून लॉकडाऊन सारखा सोपा निर्णय घेऊ नका,’ अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि माजी पालकमंत्री भाजप नेते गिरीश बापट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.